फलटण : फलटण शहरातील मुख्य रस्त्यालगत नारिंगी रंगाच्या दुर्मिळ स्कॉप्स घुबडाची प्रथमच नोंद झाली आहे. या पक्ष्याच्या आगमनामुळे फलटणच्या समृद्ध जैवविविधतेत महत्त्वाची भर पडली असून पक्षीमित्र आणि निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्याहून फलटणकडे परतत असताना 'नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण'चे सदस्य तथा वन्यजीव छायाचित्रकार गणेश धुमाळ आणि त्यांचे सहकारी अनिकेत सोनवलकर यांना मुख्य रस्त्यालगत एका झाडाच्या बुंध्यावर हे छोटे घुबड बसलेले दिसले. सुरुवातीला नेहमी आढळणारे ठिपकेवाले पिंगळे असावे, असा त्यांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, जवळून बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा दुर्मिळ स्कॉप्स घुबड असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हे घुबड झाडाजवळील खाजकुयलीच्या झुडपांवरील सुरवंट खाताना दिसून आले. परिसरातील वाहनांची व नागरिकांची वर्दळ असूनही ते शांतपणे आपले खाद्य टिपण्यात मग्न होते. या दुर्मिळ क्षणाची नोंद व्हावी यासाठी गणेश धुमाळ यांनी तत्काळ घरी जाऊन कॅमेरा आणला आणि रात्रीच्या अंधारात या पक्ष्याची छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.
स्कॉप्स घुबड हे आकाराने साधारण २० ते २५ सेंटीमीटर इतके लहान असते. याचा नारिंगी-तपकिरी रंग झाडाच्या सालीशी हुबेहूब मिळताजुळता असल्याने दिवसाच्या उजेडात ते सहज नजरेस पडत नाही. डोक्यावरील कानांसारखे दिसणारे पिसांचे छोटे तुऱ्ये हे या पक्ष्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. प्रामुख्याने निशाचर असणारा हा पक्षी सुरवंट, नाकतोडे आणि विविध कीटक खाऊन उपजीविका करतो. परिणामी शेतीसाठी उपद्रवी ठरणाऱ्या कीटकांवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण राहण्यास मदत होते आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
फलटण परिसरात झालेली या दुर्मिळ पक्ष्याची नोंद येथील जैवविविधतेची साक्ष देणारी आहे. अनेक दुर्मिळ पक्षी आणि वन्यजीवांचे अस्तित्व केवळ दाट जंगलांवर अवलंबून नसून स्थानिक झुडपे, खुरटी वने आणि गवताळ प्रदेशांवरही तितकेच अवलंबून असते. मात्र, शहरीकरण आणि विकासाच्या प्रक्रियेत असे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. केवळ मोठ्या जंगलांचेच नव्हे, तर आपल्या सभोवतालच्या खुरट्या वनक्षेत्रांचे, गवताळ प्रदेशांचे आणि नैसर्गिक झुडपांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. निसर्गातील अन्नसाखळी आणि प्रत्येक जीवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे ही काळाची गरज असल्याचे या नोंदीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
फलटणमध्ये प्रथमच दुर्मिळ 'स्कॉप्स घुबड'चे दर्शन; खुरटी व गवताळ वने जपण्याची गरज अधोरेखित
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा