सातारा : राज्यामध्ये प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दि. ३१ ऑक्टोबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी दिनांक २७ ऑक्टोबर ते दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभर दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाकरिता यावर्षी 'दक्षता-आपली सामायिक जबाबदारी' ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. सातारा जिल्हयातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये लोकसेवकांकडून होणा-या लाच मागणीच्या अनुषंगाने नागरिकांनी पुढे येवून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा सातारा येथे निर्धास्तपणे तकारी देणेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा उप अधीक्षक राजेश वाघमारे यांनी जनतेस आवाहन केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा सदैव नागरिकांच्या बाजूने ठामपणे उभा राहिल आणि लाचखोरांविरुद्ध कारवाई करेल, भ्रष्टाचार मुक्त समाज हा केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने होवू शकेल. तसेच लाचखोर व्यवस्थेविरोधात निडरपणे उभे राहण्याची देखील आवश्यकता असून ती आपली एक सामाजिक जबाबदारी देखील आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिलेनंतर, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच शासकीय कार्यालयातील कायदेशीर काम प्रलंबीत राहणार नाही याचा पाठुपरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा कार्यालयाकडून केला जाईल. समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करणेसाठी व विकासाला गती देणेसाठी तसेच जनतेची आर्थिक पिळवणूक होवू नये करिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा सातारा यांना सहकार्य करा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा कार्यालयाकडून सातारा शहारापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील नागरिकांसाठी तक्रार देणेकरिता जिल्हयाचे ठिकाणी येणेची गैरसोय टाळणेकरिता केवळ खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क केल्यास 'ए.सी.बी. आपल्या दारी' या संकल्पने अंतर्गत आमचेकडून आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी येवून आपल्या तक्रारीची दखल घेवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या माध्यमातून सातारा शहरापासून दूर राहणा-या नागरिकांची तक्रार देणेकरिता होणारी गैरसोय तसेच प्रवासाचा वेळ व खर्च टाळता येणार आहे.
सातारा जिल्हयातील कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणत्याही लोकसेवकाने अथवा खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी किंवा कोणतेही शासकीय काम करुन दिल्याच्या मोबदल्यात शासकीय फी व्यतीरिक्त किंवा इतर कोणत्याही स्वरुपात लाचेची मागणी केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सअप मोबाईल क. ७०५७५७१०६४ किंवा मोबाईल क्र. ९५९४५३११०० किंवा ९७६३४०६५०० यावर संपर्क करुन आपण शासकीय कार्यालयात लाच मागणा-या लोकसेवकाची अथवा खाजगी इसमाची तक्रार देवू शकता तसेच आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा कार्यालयाचा दूरध्वनी क. ०२१६२ २३८१३९ यावर देखील संपर्क करुन तसेच समक्ष आमचे कार्यालयात येवून तकार देवू शकता. आपण दिलेल्या तक्रारीची योग्य दखल घेवून लाचखोर लोकसेवका विरुद्ध कडक कारवाई केली जाईल. तसेच तक्रारदाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकातून कळविण्यात आले आहे