सातारा : केवळ १५ दिवसावर नवीन वर्षाचे स्वागत आले असतानाच गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवेमध्ये विस्कळीतपणा आल्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन भक्तांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून मानसिक त्रास टाळण्यासाठी ते आता कोकणालाच अधिक पसंती देऊ लागले आहेत. कोकणासह महाबळेश्वर आणि पाचगणी येथील हॉटेलमधील रूम बुक करण्यासाठी अनेकांनी आत्तापासूनच सुरुवात केली आहे. एकूणच याही वर्षी नवीन वर्षाचे स्वागत जोशात होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेले १० दिवस देशांतर्गत व देशाच्या बाहेर सुरू असणाऱ्या इंडिगो विमान सेवेला खो बसल्यामुळे त्याचा फटका केवळ सामान्य पर्यटकांनाच नव्हे तर केंद्रीय मंत्री, खासदार, देशातील विविध आमदारांसह सेलिब्रिटींना ही मोठ्या प्रमाणावर बसला. इंडिगो विमानसेवा अद्यापही पूर्वावस्थेत न आल्यामुळे सातारा जिल्ह्यातील हौशी पर्यटक भक्तांनी यावर्षी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी परराज्य अथवा परदेशात न जाता कोकणालाच अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे यावर्षी गोवा, वेंगुर्ले, गणपतीपुळे, गुहागर, कर्दे बीच, अलिबाग या पर्यटन स्थळावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक हौशी पर्यटकांनी आत्तापासूनच आपल्या आवडत्या ठिकाणी बुकिंगची व्यवस्था करण्यास प्रारंभ केला आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणाला मिनी काश्मीर असे म्हटले जाते. या ठिकाणी नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. सध्या इंडिगो विमानसेवेची परिस्थिती पाहता राज्यातील पर्यटक अन्य राज्य अथवा देशात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी न जाता महाराष्ट्रालाच प्राधान्य देतील अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यावर्षी केवळ महाबळेश्वरच नव्हे तर पाचगणीतही मोठ्या प्रमाणावर पर्यटक उपस्थिती लावतील ही बाब लक्षात घेता आत्तापासूनच महाबळेश्वर आणि पाचगणी येथील हॉटेलमधील रूमच्या बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरची बाजारपेठही सजली असून दुकानदारांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
तापोळा, कास, ठोसेघर येथेही होणार हाउसफुल गर्दी
सातारा शहर व परिसरातील तरुणाई सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जवळ असणाऱ्या तापोळा, कास, ठोसेघर, चार भिंती परिसराला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात. हुडहुडी भरवणारी थंडी कितीही पडली तरी प्रतिवर्षी तरुणाई मधील उत्साह अजिबात कमी होत नसल्याचे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहर व परिसरात वास्तव करणाऱ्या तरुणाई नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आत्तापासूनच नियोजनामध्ये गुंतली आहे.