सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेप्रमाणे सातारा पोलिसांनी हरवलेल्या महिला व बालकांच्या संदर्भात ऑपरेशन शोध मोहीम राबवण्याचे निश्चित केले आहे. ही शोध मोहीम 17 एप्रिल ते 15 मे या दरम्यान राबवली जाणार आहे. या मोहिमेमध्ये तब्बल 200 हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हरवलेल्या महिला व बालक यांचा शोध घेण्याकरता ऑपरेशन शोध मोहीम राबवली जाणार असल्याचे समीर शेख यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, ही मोहीम 17 एप्रिल ते 15 मे अशी तब्बल 30 दिवस राबवली जात असून यामध्ये हरवलेल्या महिला व बालके यांचा रेल्वे स्थानके, बस स्थानके, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे येथे शोध घेतला जाणार आहे. तसेच विविध ठिकाणी फिरणाऱ्या बेवारस बालकांची चौकशी करून त्यांना पालकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. याकरता उपविभागीय स्तरावर तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अल्पवयीन बालकाकडून काम करून घेतले जात असेल, अल्पवयीन मुले-मुली पळून येऊन राहत असल्याची शंका असेल, भीक मागणाऱ्या बालकांबरोबर असणारी व्यक्ती त्यांचे पालक नसतील असे निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा यांच्याशी संपर्क साधावा किंवा डायल 112 या नंबर वर संपर्क करून माहिती द्यावी.
या संबंधाने माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या माध्यमातून हे ऑपरेशन राबवले जाणार आहे.