सातारा : मंत्रीपद मिळाल्यानंतरचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पहिला वाढदिवस सातार्यात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर कार्यकर्ते-पदाधिकार्यांनी रक्तदान शिबिरे, अन्नदान, क्रिकेट स्पर्धा, लकी ड्रॉ, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या नेत्याला वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. सायंकाळी सातार्यातील कला व वाणिज्य कॉलेज मैदानावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मान्यवरांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते व हितचिंतकांनी शिवेंद्रसिंहराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस असल्याने गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहराला उत्सवाचे स्वरूप आले होते. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची येथील निवासस्थानावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. संपूर्ण शहरभर शुभेच्छांचे फ्लेक्स लागले होते. तसेच सातारा येथील पोवई नाक्यावर भव्य मंच उभारण्यात आला होता. शहरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी डीजे आणि विद्युत रोषणाई केली होती.
रविवारी वाढदिवशी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकाळी मंगळवार पेठ येथे गारेच्या गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना येथे कार्यस्थळावर भवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दिवंगत अभयिसंहराजे भोसले यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून अभिवादन केले.
यानंतर वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रम स्थळी भेटी दिल्या. सातारा शहराची हद्दवाढ झालेल्या रांगोळे कॉलनी येथील बहुउद्देशीय उद्यान प्रकल्पाचे त्यांनी लोकार्पण केले. भविष्यात याठिकाणी ऑलिंपिक दर्जाचा स्विमिंग टँक, पेढ्याचा भैरोबा डोंगर विकास प्रकल्प, सैदापूरला जोडणारा पूल ही सर्व कामे मंजूर झाली आहेत. भविष्यात परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी वह्या भेट देऊन अभिष्टचिंतन केले.
याप्रसंगी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य हेमंत कासार, अविनाश कदम, अमोल मोहिते, भारत भोसले, बाळासाहेब गोसावी, अक्षय जाधव, तुषार जोशी, राजेंद्र मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, नितीन तरडे, निलेश धनावडे, राजेंद्र केंडे, प्रा. संग्राम शिंदे, विजय देसाई, बलभीम शिंगरे, मुख्याधिकारी अभिजित बापट, बांधकाम अभियंता दिलीप चिद्रे, राज माजगावकर, धनंजय कुलकर्णी, केदार नाईक, संयोगिता माजगावकर, पिंटू कडव, रमेश इंदलकर, महेंद्र गायकवाड तसेच सहकारी, महिला व अबालवृद्ध नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे महिला टी 20 क्रिकेट लीग स्पर्धेचा त्यांनी शुभारंभ करून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध मान्यवर, आयोजक, खेळाडू उपस्थित होते. गोडोली येथे रक्तदान शिबिराचा शुभारंभ करून आयोजक व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. वळसे ता. सातारा येथील एहसास मतिमंद शाळेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत मिष्ठान्न वाटप करण्यात आले.