समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी; नागरिकांना मते मांडण्याची संधी, नागरिकांनी सहभागी व्हावे - शीतल तेली-उगले

by Team Satara Today | published on : 22 November 2026


पुणे  : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पुणे विभागात २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर विभागीय जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीत हितसंबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व  निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
पुणे महसूल विभागातील जनसुनावणीचे आयोजन  २९ नोव्हेंबर रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर सभागृहात करण्यात आले आहे. सुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले असून २९  नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हा सकाळी १० ते ११ या वेळेत, सांगली सकाळी ११.३० ते १२.३०, सोलापूर दुपारी १ ते २, कोल्हापूर दुपारी ३ ते सायंकाळी ४ आणि पुणे जिल्ह्यासाठी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत होईल.
या जनसुनावणीसाठी नागरिकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा  संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे. या समितीचे सदस्य  हे सुनावणी कामी  पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी ही समिती पुढे प्रत्यक्ष होईल. तसेच संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या नागरिकांची सुनावणी ही व्हिडियो काॅन्फरसिंगद्वारे घेण्यात येणार आहे.
ज्या नागरिकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मते नोंदवायची आहेत त्यांना  महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टल⁠ वर ३७ मुद्यांची माहिती देता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. यशवंत पाटणे : साहित्यिक संस्कृतीचे दीपस्तंभ

संबंधित बातम्या