सातारा : आडगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष देवराम पवार यांची तलाठी कार्यालयामध्ये हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद महसूल विभागात उमटले आहेत. सातारा जिल्हा तलाठी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य संघटनेचे ज्ञानदेव डुबल, उपाध्यक्ष विठ्ठलराव सोडमिसे, जिल्हाध्यक्ष एल. एल. बामणे, चंद्रकांत पारवे इत्यादी सदस्य यावेळी उपस्थित होते.
हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, महसूल विभागातील तलाठी हे जबाबदार पद आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात एखाद्या सरकारी कार्यालयात कर्मचार्याच्या हत्येची घटना घडते, हे निंदनीय असून यामधील आरोपीची मानसिक विकृती दिसून येते. सातारा जिल्हा तलाठी संघ या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. तलाठी संवर्गाला सातत्याने वेगवेगळ्या कारणावरून बदनाम केले जात आहे.
या घटनेमुळे संतोष पवार यांचे कुटुंबीय उध्वस्त झाले आहे. त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. तसेच तलाठी संवर्गातील कर्मचार्यांच्या सुरक्षितता प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात राज्य शासनाने ठोस उपाययोजना करावी. त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यातील तलाठ्यांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले. यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते.
आडगाव येथील तलाठी हत्येचा सातारा तलाठी संघटनेकडून निषेध
जिल्हा प्रशासनाला निवेदन, तलाठ्यांचे सातारा जिल्ह्यात काम बंद आंदोलन
by Team Satara Today | published on : 29 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा