दहिवडी : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी दिलेल्या तक्रारीत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेला तुषार खरात हा संबंधित महिलेच्या अधिक संपर्कात असल्याचे आणि सुभेदार हे खरात व संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक पुराव्यात समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तुषार खरात याने कार्यकर्त्यांकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार मंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या आठवड्यात दहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती. दहिवडीत दाखल असलेल्या गुन्ह्यात अनिल सुभेदार हे तुषार खरात व संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले. संशयितांना सहकार्य केल्याचे समोर आल्यानंतर शुक्रवारी दहिवडी पोलिसांनी सुभेदार यांना ताब्यात घेऊन अटक केली. मंत्री गोरे यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास सध्या म्हसवडचे सपोनि अक्षय सोनावणे करत आहेत. दहिवडी पोलिसांनी सुभेदार यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली.