सातारा : वर्ये, ता. सातारा येथील जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल, येथे मुख्याध्यापक बाबासाहेब महादेव कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्या प्रेरणेतून ‘साहित्यवेल वाचन प्रसार अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमास प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, सौ. सुनिता वाघमारे, गोपीचंद पवार, बबन निकम, डॉ. रचना मोरे, मधुकर भोसले, उमेश शिवथरे, प्रसाद लाटकर, जयदीप ननावरे यांच्यासह देणगीदार, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी समूहगीत गायन व संगीतमय कवायतीचे प्रभावी सादरीकरण केले. देणगीदारांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यदिन निमित्ताने भारतीय नागरिकांची कर्तव्ये सांगत प्रा. डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, “वाचनसंस्कृती व नैतिक मूल्यांची जपणूक हीच खऱ्या स्वातंत्र्याची पायाभरणी आहे.” केवळ ध्वजारोहण किंवा राष्ट्रगीत गाणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे; तर प्रत्येक महिला व मूल सुरक्षित, सन्मानित आणि सुखी असणे हेच खरे स्वातंत्र्य आहे. मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांतून ज्ञानाची सुरुवात होत असल्याने विद्यार्थ्यांनी विचारशील नागरिक बनावे, असे ते म्हणाले.
‘साहित्यवेल वाचन प्रसार अभियाना’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबत वर्तमानपत्रे, विज्ञान, कायदा, क्रीडा व इतर अवांतर साहित्याचे दररोज किमान अर्धा तास वाचन करावे. पुस्तकांसोबत समाजातील माणसे वाचण्याची संवेदनशीलता आणि नैतिक मूल्यांची जोपासना ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेच्या विकासासाठी, विशेषतः मुलींच्या स्वच्छतागृहासाठी दिलेल्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थी व समाजाने मातृसंस्थेच्या प्रगतीसाठी कायम पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले.
यावेळी जयदीप ननावरे यांनी करपे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी माजी विद्यार्थी संघ सातत्याने विकासकामात योगदान देत असून भविष्यातही शाळेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीसाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.
मुख्याध्यापक बाबासाहेब महादेव कोकरे यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व, शिक्षणाचे मूल्य, वाचनसंस्कृती आणि राष्ट्रनिर्मितीत विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आर. एस. देसाई यांनी केले. देणगीदार, मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला