सातारा : खिंडवाडी येथे दि. १५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका महिलेला लुटून तिच्याजवळील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि कागदपत्रे लंपास करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुषमा अनिल बाबर (वय ४५,रा. अमरलक्ष्मी,संभाजीनगर,सातारा) या खिंडवाडी येथील नॅशनल गॅरेजच्या जवळ नैसर्गिक विधीसाठी थांबल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांच्या जवळील पाच ग्रॅम वजनाची बोरमाळ, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, दहा ग्रॅम वजनाचे कर्णफुल वेल, दोन ग्रॅम वजनाच्या कानातील बुगड्या, पाच ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे छोटे मंगळसूत्र, ३ हजार रुपये रोख रक्कम, त्यांचे आणि पतीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक आणि जवळ असलेला मोबाईल असा एकूण ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून लंपास केला. याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.