गोकूळ निवडणुकीचे उदाहरण पालकमंत्र्यांनी आणि इतर नेत्यांनी डोळ्यासमोर ठेवावे : ना. उदय सामंत, सचिन सानप यांचे जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर

मंत्री मला ओळखत नसतील, पण मी सर्व सामान्य शिक्षकांचा प्रतिनिधी : सचिन सानप

by Team Satara Today | published on : 19 October 2026


पुणे : गोकूळ निवडणुकीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्र्यांनी बोलावे, काही मंत्री सानप यांना ओळखत नसतील. मात्र, या निवडणुकीनंतर ते ओळखायला लागतील. सचिन सानप हे सर्वसामान्य कुटूंबामधून आलेले उमेदवार आहेत. ते संस्थाचालक नाहीत, तर शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षकांच्या प्रश्‍नांची जाण आहे, असे प्रतिपादन ना. उदय सामंत यांनी केले आहे.
ना. सामंत म्हणाले, काही नेते किंवा पालकमंत्री सचिन सानप यांना ओळखत नसतील, तर त्यांनी ’गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे’ ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवावे. ही कोणतीही भारत-पाकिस्तानची लढाई नसून महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढत आहे, त्यामुळे कुणीही जास्त हवेत न जाता सबुरीने आणि शांततेने घेतले पाहिजे. जर अशाच प्रकारच्या अरेरावीच्या किंवा कमी लेखणार्‍या गोष्टी चालू राहिल्या, तर मतदार निवडणुकीमध्ये कशी जागा दाखवून देतात, हे गोकुळच्या निकालातून स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आणि इतर नेत्यांनी कोणालाही कमी न लेखता जपून आणि विचार करून बोलले पाहिजे, असा कडक इशाराही उदय सामंत यांनी दिला. सानप यांना आज कुणी ओळखत नसेल, पण आगामी निवडणुकीच्या निकालानंतर संबंधित मंत्री आणि नेते त्यांना नक्कीच ओळखायला लागतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन नवनाथ सानप यांनीही भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सांगितले की, मी सर्वसामान्य शिक्षक आहे. त्यामुळे मंत्री मला ओळखत नसतील, पण ज्यांच्या प्रश्नांसाठी मी लढत आहे ते हजारो शिक्षक मला ओळखतात.
ते पुढे म्हणाले की, शिक्षकांचे खरे प्रतिनिधित्व करण्यासाठीच आपण निवडणूक लढवत असून शिक्षक मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रश्न केल्यास भाजपला शिक्षक उमेदवार न मिळाल्याने संस्थाचालकाला उमेदवारी देण्यात आली, अशी टीका करत सानप यांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी विधाने टाळावीत, असे आवाहन केले. तसेच रवींद्र धंगेकर यांच्या उदाहरणाचा उल्लेख करत, पूर्वी त्यांनाही ’कोण?’ असा प्रश्न विचारला गेला होता; पण जनतेने त्यांना आमदार केले. यावेळीही शिक्षकच निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी विधान परिषदेत प्रभावी आवाज बनण्याचा निर्धारही सचिन सानप यांनी यावेळी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊसदराच्या प्रश्नावर रयत क्रांतीचे सातार्‍यात आंदोलन; शासन आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
पुढील बातमी
खा. उदयनराजे भोसले यांनी सपत्नीक घेतले प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन; बळीराजाच्या समृद्धीसाठी घातले साकडे

संबंधित बातम्या