सातारा : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने लाडकी बहीण योजनेला नाव द्यावे, त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल आणि ते धाडस महायुती सरकारने दाखवावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.
ज्या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत आले, त्या योजनेचे श्रेय अजितदादा पवार यांना जाऊ नये म्हणूनच राज्य सरकार निर्णय घेण्यात टाळाटाळ करत असल्याची टीकाही त्यांनी केली. आम्ही सुरुवातीपासूनच या योजनेला अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी करत आहोत. मात्र तसे केल्यास इतर ‘लाडके भाऊ’ काय म्हणतील किंवा काय भूमिका घेतील, या भीतीमुळे सरकार निर्णय घेत नसल्याचे दिसते. ही भूमिका योग्य नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपुलाला अजितदादा पवार यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र आम्ही लाडकी बहीण योजनेलाच त्यांचे नाव देण्याची मागणी करत आहोत. या नावाला आमचे पूर्ण समर्थन असून महायुती सरकारने हे नाव देण्याचे धाडस दाखवावे, अशी ठाम भूमिका आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली.