वाराणसी : लाल बहादूर शास्त्री विमानतळावर आज सकाळी सुरक्षा तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. परवानाधारक पिस्तुलाची तपासणी सुरू असतानाच अचानक गोळी सुटली. या गोळीबारात विमानतळावरील सुरक्षा तपासणीच्या कामात असलेले दोन कर्मचारी जखमी झाले. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनेनंतर विमानतळ परिसरात काही काळ खळबळ उडाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी विमानतळावर धाव घेतली. पोलिसांनी कमलेश राय यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नेमकी चूक कुठे झाली आणि शस्त्र हाताळताना सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक कमलेश केदारनाथ राय वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX 1810 या विमानाने प्रवास करणार होते. विमान पकडण्यासाठी ते सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानतळावर पोहोचले. नियमानुसार चेक-इन करताना त्यांनी आपल्याकडे असलेल्या परवानाधारक शस्त्राची माहिती विमानतळ प्रशासनाला दिली.
राय यांच्याकडे ७.६२ मिमी क्षमतेचे पिस्तुल आणि २१ जिवंत काडतुसे असल्याची माहिती समोर आली आहे. शस्त्राची माहिती दिल्यानंतर त्यांना निर्धारित सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे पिस्तुलाची तपासणी आणि हाताळणी सुरू असतानाच अचानक त्यातून एक गोळी सुटली.
सुदैवाने गोळी थेट कोणाला लागण्याऐवजी भिंतीवर किंवा दुसऱ्या दिशेने आदळून परतल्याने जवळच असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना तिचा फटका बसला. या घटनेत रोहित राज आणि सुमन कुमारी हे दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांमध्येही काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.