सातारा : सातारा बसस्थानकाजवळील सेव्हन स्टार परिसरात एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेची चलाखीने फसवणूक करत सोन्याचे दागिने लंपास करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन संपत तोडकर (वय ८५, रा. आसनगाव कुमठे) या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात थांबल्या होत्या. त्याचवेळी अंदाजे ५० वर्षांची एक अनोळखी महिला त्यांच्याशी गप्पा मारू लागली. बसस्थानकात मारामारी सुरू असल्याचे सांगत तिने तोडकर यांना गळ्यातील दागिने काढून पाकिटात ठेवण्याचा सल्ला दिला. वृद्धेचा विश्वास संपादन करून तिने हातचलाखीने पावणे दोन तोळे वजनाची, ३० हजार रुपये किंमतीची गोल मणी असलेली एकपदरी बोरमाळ स्वत:कडे घेतली आणि पाकिटात ठेवण्याच्या बहाण्याने तिथून पलायन केले.
या घटनेनंतर सुमन तोडकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.