सातारा : वाठार स्टेशन पोलिसांनी बिचुकले (ता. कोरेगाव) येथील पळसवाट शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच मोटारसायकली असा एकूण 3 लाख 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार डी.बी. पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, बुधवारी (दि. 27) गोपनीय माहितीदारामार्फत बिचुकले गावच्या हद्दीत पळसवाट शिवारात काहीजण पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोउनि गहिनीनाथ सातव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक व पंचांसह घटनास्थळी अचानक छापा टाकण्यात आला.
या कारवाईत सात जणांना जागीच पकडण्यात आले. आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम तसेच मोटारसायकली असा एकूण 3 लाख 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे - अर्जुन नारायण पवार (वय 50), मानसिंग साहेबराव पवार (वय 61), विनोद हणमंत पवार (वय 45), शिवाजी नथु शिंदे (वय 70), अरुण धर्माजी सपकाळ (वय 65), बाळकृष्ण चंदरराव पवार (वय 47) - (सर्व रा. बिचुकले, ता. कोरेगाव, जि. सातारा ) तसेच 7) आण्णा शंकर पवार (वय 46, रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव).
या गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे करीत आहेत.
या कारवाईत पोउनि नितीन भोसले, पो. हवालदार उदय जाधव, प्रकाश चव्हाण, प्रतिक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे तसेच महिला पोलीस कर्मचारी दिपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख व पूजा जगताप यांनी सहभाग घेतला.