नवी दिल्ली : भारतीय नौसेनेच्या इतिहासात एक सुवर्णक्षण नोंदवण्यात आला आहे. सब लेफ्टनंट आस्था पनिया यांनी नौसेनेच्या पहिल्या महिला फायटर पायलट होण्याचा मान पटकावला आहे. ‘फायटर स्ट्रीम’मध्ये प्रवेश करून केवळ स्वतःसाठीच नव्हे तर या क्षेत्रात करिअर करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठीही एक नवीन वाट निर्माण करून दिली आहे. विशाखापट्टणम येथील INS डेगा येथे पार पडलेल्या विशेष समारंभात त्यांना ‘विंग्स ऑफ गोल्ड’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
INS डेगा येथे झालेल्या समारंभात आस्था पूनिया आणि लेफ्टनंट अतुल कुमार ढुल यांना हा बहुमान देण्यात आला. हा पुरस्कार भारतीय नौसेनेचे असिस्टंट चीफ ऑफ नेव्हल स्टाफ (एअर) रिअर अॅडमिरल जनक बेवली यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार सोहळा ‘सेकंड बेसिक हॉक कन्वर्जन कोर्स’च्या यशस्वी पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.
या ऐतिहासिक टप्प्यामुळे भारतीय नौसेनेतील महिलांच्या सहभागाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. यापूर्वी महिलांना नौसेनेत पायलट म्हणून संधी मिळत होती, मात्र फायटर जेट उडविण्याची म्हणजेच ‘फायटर स्ट्रीम’मध्ये त्यांना संधी नव्हती. आस्था पूनियाने हे बंधन तोडून नौसेनेत महिलांसाठी एक ऐतिहासिक मार्ग मोकळा केला आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 7 मे रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून कठोर प्रत्युत्तर दिले. या कारवाईत नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) ची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत सुमारे ₹1.05 लाख कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यात क्विक रिऍक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईल सिस्टीम (QRSAM), नौसेनेसाठी नवीन युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, मायन्स आणि अन्य अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे.
DAC च्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल, ट्राय-सर्व्हिसेससाठी इंटीग्रेटेड कॉमन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम, मायन काउंटरमेजर व्हेसल्स, सबमर्सिबल ऑटोनोमस व्हेसल्स आणि सुपर रॅपिड गन माउंट्स यांचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे लष्कर, नौसेना आणि वायुदल यांच्या सामूहिक मारक क्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणतील. आस्था पुनियाच्या या ऐतिहासिक यशाने आणि संरक्षण क्षेत्रातील या नव्या निर्णयांनी भारताच्या संरक्षण यंत्रणेमध्ये एक नवा विश्वास आणि सामर्थ्य निर्माण झाले आहे.