कराड : दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील ट्रक अडवून त्यांच्याशी हुज्जत घालत त्यावर दगडफेक करत दहशत माजविणाऱ्या तिघांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने काल रात्री अटक केली. डीबीच्या कर्मचाऱ्यांनी या संशयितांची आज सकाळी शहरातून धिंड काढली. त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना चालवत नेले. शहरात त्याची जोरदार चर्चा आहे. उमर समीर सय्यद, इब्राहिम साजिद सय्यद, अमन जावेद सय्यद (तिघे, रा. सुमंगलनगर, कराड ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, की परवा रात्री येथील दत्त चौकात मद्य प्राशन करून काही तरुणांनी दहशत माजवली. महामार्गावर जात तेथून निघालेला ट्रक त्यांनी अडविला. त्याच्याशी हुज्जत घालून त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्या ट्रकवर दगडफेकही केली. त्यात ट्रकचे नुकसान केले. या प्रकाराने सुमारे पाऊणतास वाहतूक ठप्प झाली होती.
दगडफेकीत ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. हा प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही स्पष्ट दिसत होते. दहशत माजवून ते तिघेही पसार झाले होते. सीसीटीव्ही व मिळालेल्या माहितीवरून काल रात्रीच डीबीच्या पथकाने त्या तिघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात नेताना चालवत धिंड काढण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर, फौजदार निखिल मगदूम, हवालदार सज्जन जगताप, विजय मुळे, संग्राम पाटील, आनंदा जाधव, दिग्विजय सांडगे, मोहसीन मोमीन, अमोल देशमुख यांनी त्यांना न्यायालयात नेले. तेथे त्यांना कोठडी सुनावली आहे.