सातारा : सरकारी यंत्रणा आपल्या लाल फितीच्या कारभाराचा सर्वसामान्यांना नेहमीच फटका देते. कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या शिंदे परिवाराला सरकारी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा भेदक अनुभव घ्यावा लागत आहे. उंब्रज गावातील नीलम शिंदे या 35 वर्षे विद्यार्थिनीचा अमेरिकेत 11 दिवशी अपघात झाला. मात्र अजूनही तिच्या वडिलांना मेडिकल इमर्जन्सी म्हणून व्हिजा मिळू शकलेला नाही. रुग्णालयात मृत्यूची झुंज देत असलेल्या लेकीला पाहण्यासाठी बापाला मंत्र्यांच्या बंगल्यांच्या पायर्या झिजवाव्या लागत आहेत, हे दाहक वास्तव समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज गावातील नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनींचा अमेरिकेत 11 दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेत आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिजा मिळेना. त्यामुळे तिचे वडील तानाजी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन व शासनाकडे अर्ज करून हतबल झालेल्या दमलेल्या बापाची कहाणी कोणी ऐकेल का ? या बापाला लेकीच्या भेटीसाठी कोणी व्हिजा देईल का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे नीलम चे वडील तानाजी शिंदे यांनी यासाठी अनेक मंत्र्यांच्या घराच्या पायर्या झिजवल्या आहेत. अमेरिकेत शिक्षणासाठी वास्तव्य असलेल्या नीलमचा 14 फेब्रुवारी रोजी व्यायामासाठी जात असताना एका चार चाकी गाडीने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातातील दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र रक्त संबंधातील नातेवाईक आल्याशिवाय या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल होत नसल्याचे अमेरिकन पोलीस सांगत आहेत. या अपघातात नीलमच्या दोन्ही हातापायांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ती सध्या कोमात असल्याचे सांगितले जात आहे. नीलमची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रज मधील पालकांना याबाबतची माहिती मिळत आहे.
वडील तानाजी यांना मुलीच्या भेटीसाठी इमर्जन्सी व्हिजा मिळत नसल्याने प्रशासनातील कच्चे दुवे समोर आले आहेत. तानाजी शिंदे यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, यांच्याकडून व्हिजासाठी संपर्क केला मुंबई येथील कुर्ला पासपोर्ट ऑफिसलाही पालकांनी भेट दिली. मात्र व्हिजासाठी त्यांना दाद मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील हॉस्पिटलने अपघातानंतर नीलमच्या पालकांना पत्र देखील दिले आहे. ज्या आधारे ते व्हिजासाठी मागणी करत आहेत. मात्र व्हिजा मिळत असल्याने वडिलांच्या हतबलतेकडे राज्य शासन लक्ष देणार का ? हा खरा प्रश्न आहे.