दिल्ली : "विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे. नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले असून सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे", अशी टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार)अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत होत्या. शरद पवार यांनी अभिजीत दीपके याच्यासोबत चर्चा केली. काल झालेल्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांचीही त्यांनी चौकशी केली.
पोलिसांची वागणूक लोकशाही मूल्यांना न शोभणारी
शरद पवारांनी भेटीनंतर एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, "नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतर-मंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. काल (20 जुलै) आपल्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे."
"आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या", असे शरद पवार म्हणाले.
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतरमंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. काल आपल्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे. आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट…
सरकारने दडपशाही न करता संवेदनशीलपणे विचार करावा
"देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले असून, सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्याचा संवेदनशीलपणे विचार करावा तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी", असे शरद पवार यांनी केंद्र सरकारला उद्देशून म्हटले आहे.