म्हसवड : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात राबविल्या जाणाऱ्या तरस संवर्धन उपक्रमाची आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. येथील तरस संवर्धन कार्याला जागतिक मान्यता मिळाली असून, या यशामुळे माणदेशाची नवी ओळख निर्माण होऊन परिसरातील वन्यजीव संवर्धनाला गती मिळणार आहे, तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. ‘आययूसीएन’च्या ‘स्पेशीज सर्व्हायव्हल कमिशन’चे सह-अध्यक्ष डॉ. शिवीश भंडारी यांनी याची घोषणा केली.
माणदेशचा परिसर हा केवळ कोरडा दुष्काळी प्रदेश नसून लांडगे, तरस आणि खोकड यांसारख्या अतिसंवेदनशील वन्यजीवांचे समृद्ध माळरान अधिवास आहे. किरकसाल ग्रामस्थ आणि जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या मदतीने येथे सखोल वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला. या लोकसहभागातून माळरानावरील तब्बल ६०६ वन्यजीव आणि वनस्पती प्रजातींचे अधिकृत दस्तऐवजीकरण पूर्ण झाले. दुष्काळी भागातील या वैज्ञानिक संघर्षाची दखल घेत ‘आययूसीएन’ने या कार्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकृत मान्यता दिली.
मान्यतेसाठी ठरलेले मुख्य निकष
माळरान अधिवासातील दुर्मिळ पेढरी तरस आणि भारतीय लांडगा यांच्या अधिवासाचा शास्त्रीय अभ्यास व काटेकोर नोंदी घेण्यात आल्या. किरकसालच्या ग्रामस्थांनी वनविभाग आणि वन्यजीव संशोधकांच्या साथीने निसर्ग संवर्धनासाठी घेतलेला सक्रिय पुढाकार महत्त्वाचा ठरला. स्थानिक तरुणांना वन्यजीव देखरेखीचे प्रशिक्षण देऊन त्यांना ‘ग्रीन गार्डियन्स’ म्हणून तयार करण्याच्या उपक्रमामुळे या मान्यतेवर मोहर उमटली.
माणदेशाचा लौकिक जागतिक स्तरावर उंचावणार
आजवर पडीक समजल्या जाणाऱ्या माळरानांना जैवविविधतेचे समृद्ध भांडार म्हणून आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळाले आहे. सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावित असलेले क्षेत्र हे घोषित झाल्यावर भारतातील तरसासाठी समर्पित पहिले संवर्धन राखीव क्षेत्र ठरेल.
माणदेशातील प्राचीन देवरायांचे जतन करून त्यांना जैवविविधता वारसा स्थळांचा दर्जा मिळवून देण्यासाठी या मान्यतेचा मोठा फायदा होईल. आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमुळे वन्यजीव पर्यटनाला संधी मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराची साधने निर्माण होतील. तरस हा प्राणी मृत सेंद्रिय घटकांची विल्हेवाट लावून परिसराची नैसर्गिक स्वच्छता राखतो, त्यामुळे साथीचे आजार रोखले जाऊन माणदेशाचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होईल.
- चिन्मय सावंत, प्रकल्पप्रमुख, किरकसाल संवर्धन प्रकल्प