सातारा : छत्रपती शाहू स्टेडियम मधील क्रीडा संकुलामध्ये अनेक क्रीडा प्रकारासाठी संकुले उपलब्ध आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारासाठी हॉल मिळत नसल्याची तक्रार राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक सागर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ज्या बॉक्सिंग क्लबला हॉल देण्यात आलेले आहेत त्यांना कोणत्या नियमांतर्गत हे देण्यात आले, हे जिल्हा क्रीडा अधिकार्यांनी स्पष्ट करावे, असा सवाल त्यांनी केला आहे.
सागर जगदाळे हे राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षित क्रीडा प्रशिक्षक असून सातारा जिल्ह्यातील गुणवान खेळाडू साठी ते मोफत कोचिंग सेवा देतात. क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या अनेक गैरवस्थापनाची त्यांनी तक्रार प्रसार माध्यमांकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.
ते म्हणाले, मी राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनी पतियाळाचा किक बॉक्सिंग चा प्रशिक्षित कोच असून या क्रीडा प्रकारांमध्ये मला राष्ट्रीय स्तरावरचे कांस्यपदक मिळाले आहे. सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंना या खेळामध्ये पुढे आणण्यासाठी माझी मेहनत सुरू आहे. छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये अनेक खेळांसाठी मैदाने उपलब्ध करून दिली जातात. 2019 मध्ये राजधानी, तर 2022 मध्ये क्रांती बॉक्सिंग क्लब साठी हॉल उपलब्ध करून देण्यात आले. गेल्या एक वर्षापासून किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारासाठी हॉल मिळावा यासाठी मी पाठपुरावा करत आहे. मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर हे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करत आहेत. याशिवाय येथील जलतरण तलाव परिसरात लाईफगार्ड म्हणून परप्रांतीय कर्मचारी भरण्यात आले आहेत. सातारा शहरातील बारा स्थानिक कर्मचारी तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहेत. जलतरण परिसरामध्ये कोणालाही वास्तव्याची परवानगी नसते. तेथे काही कर्मचार्यांना राहण्याची सोय करण्यात आली असून तेथे अनधिकृत गॅस कनेक्शन देण्यात आलेले आहे.
हे सर्व प्रकार क्रीडा धोरणाशी सुसंगत नाहीत. या संदर्भात जिल्हा क्रीडा समितीचे सचिव, जिल्हाधिकारी व अध्यक्ष पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकारात गांभीर्याने लक्ष घालावे. अन्यथा उद्यापासून उपोषण आणि येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करावे लागेल, असा इशारा जगदाळे यांनी दिला आहे.