८ लाखांच्या बनावट नोटा

दोघांना अटक

by Team Satara Today | published on : 31 May 2025


मुंबई : मालवणी पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या दोघांचा गाशा गुंडाळण्यात यश मिळवले आहे. या दोघांकडून त्यांनी १ हजार ७४० नोटा तसेच त्या छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

संपत एन्जपल्ली (४६) आणि रहीमपाशा शेख (३०) अशी आरोपींची नावे असून, दोघेही मूळचे तेलंगणा राज्याचे रहिवासी आहेत. मालवणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे हे २९ मे रोजी निगराणी पथकासह गस्त घालत असताना मार्वे बीचवर एक निळ्या रंगाची कार संशयास्पदरीत्या थांबलेली त्यांना दिसली.

२३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कारमधील व्यक्तींकडे बनावट नोटा असल्याची खबर मिळाल्याने त्यांनी याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश नगरकर यांना दिली. 

परिमंडळ ११चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे आणि नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिंडे, पोलिस हवालदार अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, शिपाई सुशांत पाटील, सचिन वळतकर, मुदसीर देसाई, समित सोरटे आणि कालिदास खुडे यांनी सापळा रचून कारमधील संशयितांना ताब्यात घेतले. 

त्यांच्या कारच्या झाडाझडतीत भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या १ हजार ७४० बनावट नोटा म्हणजेच ८ लाख ७० हजार रुपये, तसेच त्या छापण्यासाठी लागणारा प्रिंटर, लॅपटॉप, पिंक पेपर, कटर, सेलोटेप, कैची, स्केल आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार असा २३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याचे हटवले थडगे
पुढील बातमी
नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा

संबंधित बातम्या