साताऱ्यात रविवारी लायन्स इंटरनॅशनलचा नेतृत्व विकास परिसंवाद

कृत्रिम बुद्धिमत्ता, साक्षर नागरिकत्व आणि मानवी वर्तनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

by Team Satara Today | published on : 20 November 2026


सातारा : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी १, रिजन २ आणि लायन्स क्लब ऑफ सातारा युनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २२) साताऱ्यात 'टुवर्ड्स द लाइट – लीडरशिप सेमिनार' या नेतृत्व विकास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेजवळील डीसीसी बँक सभागृहात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हा परिसंवाद पार पडणार असून, त्याचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
या परिसंवादाची माहिती रिजन चेअरमन एमजेएफ लायन महेंद्र कदम, लायन जयवंत काटवटे, लायन बाळासाहेब शिरकांडे आणि लायन नरेंद्र रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शैक्षणिक ज्ञानासोबतच सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि सक्षम नेतृत्व विकसित करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने 'नॉलेज + व्हॅल्यूज + लीडरशिप = अ ब्रायटर फ्युचर' या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचे आयोजन केले आहे. उद्घाटन समारंभाला लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन राजेंद्र शहा कासवा आणि व्हॉइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-१ डॉ. किरण खोराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परिसंवादाच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितचे (एमकेसीएल) अध्यक्ष डॉ. विवेक सावंत हे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इम्पॅक्ट ऑन द वर्ल्ड' या विषयावर मार्गदर्शन करतील. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण, उद्योग, रोजगार आणि दैनंदिन जीवनात होणारे बदल व भविष्यातील संधी यावर ते भाष्य करणार आहेत. दुसऱ्या सत्रात सामाजिक व ग्राहक मंचाचे कार्यकर्ते विवेक वेलणकर हे 'लिटरट सिटीझनशिप – सोशल अँड कन्झ्युमर फोरम ॲक्टिव्हिटीज' या विषयावर संवाद साधतील. यामध्ये नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये, ग्राहक संरक्षण आणि लोकशाहीतील जागरूक नागरिकांची भूमिका स्पष्ट केली जाईल. तिसऱ्या सत्रात महाराष्ट्र शासनाचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख हे 'सोसायटी अँड ह्युमन बिहेविअर' या विषयावर विचार मांडणार असून, मानवी स्वभाव, बदलते समाजजीवन आणि सामाजिक जबाबदारी या पैलूंवर मार्गदर्शन करतील.
रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत नोंदणी व अल्पोपाहार, १० ते १०.४५ उद्घाटन समारंभ, १०.४५ ते १२ पहिले सत्र, १२ ते १.३० दुसरे सत्र, दुपारी १.३० ते २.३० भोजन आणि २.३० ते ४ या वेळेत तिसरे सत्र अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. परिसंवादासाठी प्रति व्यक्ती २०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार असून, यामध्ये अल्पोपाहार आणि भोजनाचा समावेश आहे.
रिजन चेअरमन महेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली रिजन २ मधील सर्व लायन्स क्लबच्या सहकार्याने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, युवक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या परिसंवादात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेस लायन राजेंद्रकुमार मोहिते, लायन सुहास तळेकर, लायन डी. वाय. पाटील, लायन कुलदीप मोहिते, लायन सचिन काळे, लायन अनिरुद्ध कासकर, लायन शशिकांत पाटील, लायन शिवाजीराव फडतरे आणि लायन अनिल कदम उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासूला मारहाण केल्याप्रकरणी दोन सुनांवर गुन्हा

संबंधित बातम्या