उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती

by Team Satara Today | published on : 08 October 2024


सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 9 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून घेतल्या जाणार आहेत, याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य निवडणूक समन्वय समितीचे राज्य सदस्य प्राध्यापक सोमनाथ साळुंखे या मुलाखती घेणार आहेत. सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखतींचे सत्र पार पडणार असून यापुढे वंचितची राजकीय रणनीती स्पष्ट होणार आहे.

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सत्ता संपादन गरजेचे असल्याने गत विधानसभा निवडणुकीप्रमाणे सन २०२४ च्या होणाऱ्या विधानसभा निवडणूकीची मोर्चेबांधणी महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जोर धरु लागली आहे. ईच्छूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर प्रत्येक जिल्हावार उमेदवारांच्या मुलाखती सुरु झाल्या आहेत. त्याप्रमाणेच सातारा विश्रामगृह येथे सातारा जिल्हयातील १ ) सातारा - जावळी २) वाई - खंडाळा - महाबळेश्वर ३) फलटण ४) माण-खटाव ५ ) कोरेगाव ६) कराड - उत्तर ७ ) कराड - दक्षिण ८ ) पाटण विधानसभा मतदार संघातील ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून या मुलाखती राज्य उपाध्यक्ष आणि राज्य निवडणूक समन्वय समितीचे राज्य सदस्य प्रा.सोमनाथ साळुंखे घेणार आहेत.

ज्या उमेदवारांनी पक्षाकडे ऑनलाईन, ऑफलाईन, ईमेलव्दारे उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत त्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज आणि कागदपत्रासह आपल्या कार्याचा अहवाल व परिचय पत्रासह हजर राहण्याचे आवाहन सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे यांनी केले आहे. या मुलाखती बुधवार दि. ९ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत होणार असून अधिक माहितीसाठीही संपर्क साधण्याचे आवाहन दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन
पुढील बातमी
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती

संबंधित बातम्या