व्हिंटेज गाड्यांच्या रॅलीची सातारकरांना भुरळ

शाहू कला मंदिर परिसरात जुन्या गाड्यांचे प्रदर्शन

by Team Satara Today | published on : 16 August 2024


सातारा : व्हिंटेज कार क्लब ऑफ सातारा यांचे वतीने सातार्‍यातील शाहू कला मंदिर परिसरामध्ये व्हिंटेज गाड्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये जुन्या काळातील सुमारे वीस हून अधिक गाड्यांचा सहभाग होता. व्हिंटेज कार क्लबचे संयोजक प्रज्वल दुदुस्कर, आदित्य भोसले यांनी या रॅलीचे प्रदर्शन आयोजित केले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या कार प्रदर्शनाला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुरातन गाड्या आणि बाईक यांची शोभा दर्शवणारे एक अनोखे संमेलन सातार्‍यात आयोजित करण्यामागे या गाड्यांची माहिती आजच्या पिढीला व्हावी तसेच या वाहनांनी एकेकाळी एका पिढीला मोहिनी घातली होती. या विविध दशकातील व्हिंटेज कार आणि बाईक आणि त्याचे तंत्रज्ञान, त्याची रचना कौशल्य सातारकरांना कळावे याकरता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रज्वल दुदुस्कर यांनी सांगितले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दिवसभर चाललेल्या या संमेलनामध्ये अनेक दुर्मिळ आणि पुरातन गाड्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये फोर्ड, रॉयल एनफिल्ड बुलेट, फाईव्ह हंड्रेड जीप, राजदूत, जावा, लॅम्ब्रेटा यांसारख्या गाड्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या. या गाड्यांच्या रचनेतून तत्कालीन काळातील अभियांत्रिकी कौशल्य आणि तंत्रज्ञानाची झलक पहावयाला मिळाली. या संमेलनात सहभागी झालेल्या अनेक उत्साही गाडी मालकांनी आपल्या गाड्या आणि बाईकच्या देखभालीच्या कथा सांगितल्या. या संमेलनाने केवळ गाड्यांच्या प्रेमींची अपेक्षांची पूर्ती केली. 
या गाड्यांच्या प्रदर्शनाला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः फोर्ड कंपनीच्या जुन्या गाड्यांचे मॉडेल्स विशेष लक्षवेधी ठरले. या संमेलनाचे आयोजन पुढील वर्षी सुद्धा करण्यात येणार आहे. आणखी काही दुर्मिळ गाड्या आणि बाईक ठेवण्यात येणार आहेत. वाहन प्रेमींसाठी ही एक उत्तम संधी असून त्यातून त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणे शक्य होणार आहे. अशा व्हिंटेज वाहन प्रेमींनी व्हिंटेज कार क्लब ऑफ सातारा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रज्वल दुदुस्कर व आदित्य भोसले यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनात आकाश भोसले, अजिंक्य भोसले, मुस्तफा शेख यांनी विशेष सहकार्य दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महावितरण प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे विजपुरवठा करणार
पुढील बातमी
प्रख्यात डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधन

संबंधित बातम्या