मोबाईलवर अचानक आलेल्या ‘त्या’ अलर्टने घाबरू नका; सातारा जिल्ह्यासह देशभरात आपत्कालीन यंत्रणेची चाचणी

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा : शनिवारी दि. ०२ रोजी दुपारी सातारा जिल्ह्यासह देशभरातील लाखो नागरिकांच्या मोबाईलवर अचानक एक मोठा 'बीप' आवाज आणि व्हायब्रेशनसह इमर्जन्सी अलर्ट प्राप्त झाला. हा संदेश पाहून अनेक नागरिकांमध्ये सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र हा कोणताही धोक्याचा इशारा नसून केंद्र सरकारकडून करण्यात आलेली एक तांत्रिक चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

​राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि दूरसंचार विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम’ची ही चाचणी घेण्यात येत आहे. भविष्यात भूकंप, महापूर किंवा चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास, बाधित क्षेत्रातील नागरिकांना त्वरित सावध करण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी इंटरनेटची आवश्यकता नसून, अगदी सायलेंट मोडवर असलेल्या फोनवरही हा धोक्याचा इशारा मोठ्या आवाजात वाजू शकतो.

​ही चाचणी टप्प्याटप्प्याने देशभरात राबवली जात असून याद्वारे यंत्रणेची कार्यक्षमता तपासली जात आहे. 'सचेत' प्लॅटफॉर्मचा भाग असलेल्या या प्रणालीमुळे प्रत्यक्ष संकटाच्या वेळी प्रशासनाला एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवणे शक्य होणार आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे संदेश मोबाईलवर आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरविरुद्ध मोफत HPV लसीकरणाचा सातारा येथे शुभारंभ ; जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
पुढील बातमी
साताऱ्यात चिमुकल्यांच्या हृदयाला मिळणार नवी उभारी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

संबंधित बातम्या