सातारा : महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाज सोडला जातो. हा आवाज आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. तरी डीजेला बंदी घालावी म्हणून जेष्ठ नागरिकांच्यावतीने गांधी मैदान ते पोवई नाका असा निषेध मोर्चा काढण्यात आला.
सध्या महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात आहे. यात या कर्णकर्कश आणि कानठळ्या बसणाऱ्या आवाज यंत्रणेचा वापर केला जातो. ही माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक अशी यंत्रणा आहे, हे सिद्ध झाले आहे. डीजे यंत्रणेमुळे हृदयविकार, कर्णबधीरता अशा समस्यांचा सामना करावा लागला आहे. याला अनेक जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून विरोध करण्यात आला. मात्र, त्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे डीजेला विरोध करण्यासाठी गांधी मैदान राजवाडा ते पोवई नाका असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात डीजे विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोर्चा पोवई नाक्यावर आल्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले. यानंतर पोवई नाका येथे निदर्शने करत निषेध करण्यात आला. या सर्व संस्थांच्यावतीने डीजेवर बंदीबाबत निवेदन देण्यात येणार आहे. यात पुण्यशील सुमित्राराजे भोसले ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ शाहूनगर, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघ, समता ज्येष्ठ नागरिक संघ, माऊली ज्येष्ठ नागरिक संघ, अभिनव जेष्ठ नागरिक संघ जिहे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ परिसर जेष्ठ नागरिक संघ, जेष्ठ नागरिक संघ राजवाडा, सहवास महिला जेष्ठ नागरिक संघ, कै. कर्मवीर डॉ. मार्तंडराव सूर्यवंशी (चाचा) फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, इन्स्टट्यिूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडिया सातारा शाखा तसेच ज्ञानविकास मंडळ आदी १६ संस्था डीजेवर बंदी झालीच पाहिजे, या मागणीवर ठाम आहेत.