सातारा : ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या संघर्षवादी व पुरोगामी राजकारणाची तसेच त्यांच्या परिवर्तनवादी चळवळीतील सहभागाचा खरा इतिहास महाराष्ट्राला समजावून सांगण्याची गरज आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सतत कृतीशील राहणे हीच एनडी सरांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असे विचार प्रा डॉ भास्कर कदम यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले.
प्रा. डॉ एन डी पाटील यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथील प्रोग्रेसिव्ह फ्रंट च्या वतीने आयोजित स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात प्रा डॉ भास्कर कदम बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ व कवी प्रमोद कोपर्डे यांच्या हस्ते प्रा. डॉ एन डी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
प्रा. डॉ एन डी पाटील हे एकाच वेळी प्रेमळ आणि वात्सल्य प्रेमी होते परंतु त्याचवेळी कठोर प्रशासक ही होते हे सांगून प्रा डॉ भास्कर कदम यांनी सरांबरोबरच्या आंदोलनाचे अनेक प्रसंग सांगून त्यावेळ च्या काळात नेले.
छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ शिवाजी पाटील यांनी प्रा डॉ एन डी पाटील व दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्यातील राजकीय सभ्यतेची उदाहरणे देऊन मतभेद असले तरी सभ्यता कसे पाळायचे हे त्यांनी उदाहरणासहित सांगितले.
एन डी पाटील यांचे सार्वजनिक जीवन हे संघर्ष व पारदर्शकता याची मूर्तीपंत उदाहरण होते. त्यांचे वक्तृत्व हे तत्त्वज्ञान, वर्गवाद, साहित्य, इतिहास आणि आंतरिक चळवळ याने परिपूर्ण असे असायचे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास समजून घेण्यासाठी एन डी पाटील यांचे समग्र जीवन समजून घेणे गरजेचे आहे व त्यांचे विचार पुढे येणे काळाची गरज आहे असे किशोर बेडकीहाळ म्हणाले.
यावेळी प्रमोद कोपर्डे, विजय मांडके, शिवाजी राऊत, दिनकर झिंब्रे, प्रा. डॉ. गणेश लोखंडे, यांनीही एन डी पाटील यांच्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सातारा विभागीय दुरस्थ शिक्षण केंद्राचे समन्वयक प्रा डॉ सूर्यकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा डॉ विकास यलमार यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. अब्रार पठाण, प्रा. संदीप गायकवाड , दत्ता पवार आदी उपस्थित होते.