नाशिक : नाशिकमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या फॅक्टरीत तयार झालेल्या पहिल्या LCA तेजस (Tejas MK-1A) लढाऊ विमानाचे यशस्वीपणे उड्डाण करण्यात आले आहे. त्याच बरोबर HAL च्या HTT-40 प्रशिक्षण विमानांच्या दुसऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटनही या दिवशी करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तेजस विमान हवेत झेपावले. या विमानाचं उड्डाण जरी झाले असले तरीही भारतीय हवाई दलात त्याचा समावेश होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहे.
तेजस MK-1A हे भारताच्या स्वदेशी लढाऊ विमानांच्या क्षमतेचा एक टप्पा आहे. परदेशांवर अवलंबित्व कमी करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हे विमान पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक सक्षम व बहुउद्देशीय असणार आहे. ज्यामुळे हवाई दलाच्या लढाऊ तुकडींमध्ये नवीन वर्षभरात बदल अपेक्षित आहेत. तेजस भारताचं स्वदेशी लढाऊ विमान आहे. ते ४.५ पिढीतील मल्टी रोल फायटर जेट आहे. तेजस हवाई संरक्षण, जमिनीवर हल्ला आणि सागरी हल्ला करण्यास सक्षम आहे. याआधी तेजस Mk1 भारतीय हवाई दलात आहे परंतु Mk1A त्याचे आधुनिक व्हर्जन आहे. त्यात नवीन तंत्रज्ञान आहे जे या विमानाला अधिक सक्षम बनवते.
तेजसने गेल्या काही वर्षांत अनेक चाचणी उड्डाणे केली आहेत, परंतु आजचे उड्डाण विशेष होते. कारण ते हवाई दलात समाविष्ट होण्यापूर्वी तयारीचा अंतिम टप्पा होता. एचएएलने खूप प्रयत्न केले आहेत. इंजिन विलंबामुळे हा प्रकल्प काहीसा मंदावला होता, परंतु जनरल इलेक्ट्रिकने आता चार इंजिने दिली आहेत. यावर्षी एकूण १२ इंजिन जनरल इलेक्ट्रिककडून मिळणार आहे. चाचणीत स्वदेशी बीवीआर, एअर टू एअर मिसाइल आणि लेजर गाइडेड बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. भारतीय हवाई दलाला तेजससारख्या विमानांची गरज आहे. २६ सप्टेंबरला मिग २१ चे २ स्क्वॉड्रन एकूण ४० विमानं निवृत्त केली आहेत. त्यामुळे वायूसेनेची फायटर स्क्वॉड्रनची संख्या ३० झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चीनकडून पाचव्या पिढीतील लढाऊ विमान खरेदी करत आहे. चीनही त्यांची सर्व विमाने पाचव्या पिढीत बदलत आहे. त्यामुळे भारताला ताकद वाढवावी लागेल. तेजस याच ताकदीचा एक भाग आहे.