कमरेला लोड केलेले पिस्तूल लावून फिरणाऱ्याला भुईंज पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; सुरूर पुलाखाली मध्यरात्री पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 29 August 2026


सातारा : सुरूर (ता. वाई) गावच्या हद्दीत पुलाखाली बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्या एका तरुणाला भुईंज पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून जेरबंद केले. प्रसाद शुक्राचार्य बागल (रा. सुरूर, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

​याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे आपल्या पथकासह दि. २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास कवठे गावच्या हद्दीत शासकीय वाहनातून गस्त घालत होते. त्यावेळी सुरूर येथील उड्डाणपुलाखाली एक संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून उभा असल्याची गोपनीय माहिती सपोनि ताटे यांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना पाचारण करून सुरूर पुलाखाली छापा टाकला.

​वर्णनानुसार संशयितरीत्या उभ्या असलेल्या प्रसाद बागल यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी हे शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीस वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

​सदरची यशस्वी कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पूनम झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ आणि सागर मोहिते यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कूपर बंगला ते कनिष्क हॉल रस्त्यावरच भरतोय 'ओपन बार'; साताऱ्यातील 'फळकुटांचा' उपद्रव रोखण्याची मागणी

संबंधित बातम्या