शिरवळची पाणीपुरवठा योजना आमदार समर्थकांनी पळवली

भाजपचे कार्यकर्ते अनुप सूर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत आरोप

by Team Satara Today | published on : 31 July 2023


सातारा : शिरवळ गावासाठी भारत सरकारची मंजूर झालेली जल जीवन मिशन योजना राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले आणि त्यांच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी पळवली असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अनुप सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिरवळ गावात मराठी शाळेजवळ मंजूर असलेली ही योजना राजकीय दबावातून कळवाटणीच्या माळावर हलवण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकाराला आमचा तीव्र विरोध असून पराकोटीचा संघर्ष भविष्यात उद्भवेल, असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रदीप माने, भाजपच्या माजी सरपंच लक्ष्मीताई पानसरे, खंडाळा तालुका अध्यक्ष राहुल हाडके, राजेंद्र मगर, अतुल पवार, अजिंक्य कांबळे, हर्षवर्धन शेळके, सुरेखा हाडके, तृप्ती देशमुख, चंद्रकांत माने उपस्थित होते
सूर्यवंशी पुढे म्हणाले, शिरवळ शहरातील गट नंबर 392 येथे शिरवळ ग्रामपंचायत करता जलजीवन मिशन योजनेचे नवीन पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केंद्रीय पाणीपुरवठा मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या सहकार्याने झाले. या योजनेचे उद्घाटन ऑनलाईन करण्यात आले होते. या योजनेचा तांत्रिक तपशील जिल्हा परिषदेचे उपअभियंता गणपत शिवणकर यांनी तपासून शासनाकडे अहवाल दिला. त्याला मंजुरी मिळून त्याचे टेंडर सुद्धा निघाले. मात्र राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक उदय कबुले व राजेंद्र तांबे यांनी काही कारखानदारांना आणि बिल्डरांना व जिल्हा परिषद अधिकार्‍यांशी संगनमत करून ही योजना शिरवळपासून तीन किलोमीटर लांब कळवटणीच्या माळावर गट नंबर 944 येथे हस्तांतरित करण्याचा घाट घातला आहे. जुन्या गावठाणामध्ये फिल्टर योजनेचे पाणी यामुळे मिळणार नाही. त्यामुळे शिरवळ शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार नाही. या योजनेसाठी नीरा नदीतून पाणीपुरवठा होत आहे.
ठराविक मोठ्या धेंडांचे हित पाहून आर्थिक स्वार्थ साधण्याकरता हा घाट घातला जात असून राष्ट्रवादीचे नेत्यांनी गावाचे हित ढाब्यावर बसून स्वतःचा स्वार्थ बघू नये, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला. ही योजना स्थलांतरित झाल्यास शिरवळ गावठाणातील 2000 कुटुंबांना पाणी मिळणार नाही. प्रत्येक वेळी मकरंद पाटील मतदारसंघातील प्रत्येक विकास योजनेमध्ये खेळ घालून खंडणी उकळण्याचे काम करत आहेत, असा गंभीर आरोप सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी सोमवारी शिरवळ ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केला. 
राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गट नंबर 944 येथे दुसर्‍या भूमिपूजनाचा केलेला उद्योग आम्हाला कदापि मान्य नाही. या संदर्भात आम्ही पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मंत्रालयात जाऊन दाद मागणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. या संदर्भात न्याय न मिळाल्यास भविष्यात पराकोटीचा संघर्ष होऊ शकतो आणि हा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार असल्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ सातार्‍यात युवकांचा मोर्चा
पुढील बातमी
मणिपूर येथील घटनांच्या निषेधार्थ सातार्‍यात सहवेदना मोर्चा

संबंधित बातम्या