सातारा : थकबाकीपोटी सातारा पालिकेने सील केलेल्या गाळ्याचे कुलूप परस्पर काढल्याप्रकरणी मालमत्ता धारकावर फौजदारी गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने या मनमानी प्रकरणा संदर्भात धडक भूमिका घेतली आहे. प्रकाश रामचंद्र ओतारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केसरकर पेठ येथील सी स. नं 136/2/अ /2 कल्पक विहार अपार्टमेंट गाळा नं 9 चे मिळकत धारक विद्या प्रकाश ओतारी हे या गाळ्याचे धारक असून सदर गाळ्यांच्या करापोटी 31/3/2025 अखेर रु 3,35,105/ इतका कर थकीत असून सदर मिळकत धारकास वारंवार कर थकबाकीची मागणी केली असता मिळकत धारकाने थकीत घरपट्टी भरली नाही. त्यामुळे संबंधित मिळकत धारकास जप्ती वॉरंट काढून, इशारा पत्र देऊन संबंधित गाळा जप्त सील करण्यात आला होता.
परंतु मिळकत धारकाने जप्त सील केलेल्या गाळ्यांच्या बाबतीत गांभीर्य न घेता मिळकत धारकाचे पती प्रकाश रामचंद्र ओतारी यांनी नगरपालिकेने जप्त केलेल्या गाळ्याचे सील परस्पर तोडून कुलूप फेकून देऊन दहशत निर्माण केली. या घटनेमुळे नगरपरिषदेच्या कर विभागाने तातडीने याची नोंद घेऊन नगरपरिषदेच्या जप्ती पथकाने सील केलेल्या गाळ्याचे सील अनधिकृतपणे व बेकायदेशीररित्या तोडणारे प्रकाश रामचंद्र ओतारी यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
याकामी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यानुसार कर विभागातील अधिकारी, लिपिक व कर्मचारी यांनी या कारवाईत भाग घेतला. याप्रकरणी ओतारी यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.