सातारा : लोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्णयाची आठवण नागरिकांना होण्यासाठी तसेच संविधानाने दिलेल्या समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही गणराज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर गदा आणण्याचे काम काही शक्ती करत आहेत. या विरोधात एकसंघपणे आवाज उठवण्याची नितांत गरज आहे आणि त्या हेतूने आम्ही एकसंघपणे हा निर्धार करत यासंदर्भात लवकरच सातारा जिल्ह्यातून संविधानिक मूल्य जपण्याचा कृती कार्यक्रम घेऊन एल्गार पुकारण्यात येईल, असे म्हणत गेल्या तीन दिवसापासून सातारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले.
राष्ट्रीयता जागर अभियान सातारच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महात्मा फुले स्मृतिदिनापासून हे उपोषण सलग तीन दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत सुरू होते. तिन्ही दिवस सातारकर नागरिक बंधू भगिनींनी या उपोषणस्थळी येऊन मागण्या समजून घेतल्या आणि या मागण्यांना पाठिंबा देण्याची भूमिकाही जाहीर केली.
सलग तीन दिवस जयंत उथळे, नाझीम इनामदार, विजय मांडके, प्रा डॉ भास्करराव कदम, एडवोकेट शैलजा जाधव, दिलीप भोसले, ममता प्रामाणिक, मिनाज सय्यद, सौ. रजनी पवार, चंद्रकांत खंडाईत, हेमा सोनी, सिंधू वरकटे, प्रा संजीव बोंडे, किरण सांगळे, गणेश कारंडे, संजय करपे, मनोज चाकणकर, जगन्नाथ कुंभार, बाळासाहेब शिंदे, सुभाषराव कांबळे, रफिक शेख, सादिक अली बागवान, वामन गंगावणे, दयानंद बनसोडे, श्रीकांत कांबळे, सुभाष लावंड, महेश गुरव, राजा सातारकर, प्रा डॉ धनंजय देवी आदींनी सहभाग घेतला.
पुणे येथे ज्येष्ठ नेते डॉ बाबा आढाव यांनी संविधानिक जनजागृती करण्यासाठी सलग तीन दिवस उपोषण केले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच हे उपोषण होते.
यापुढे संविधानिक मूल्यांवर हल्ला करणार्यांच्या विरोधात व मूल्यांच्या जपणुकी संदर्भात जनजागृती करण्याच्या अनुषंगाने शिबिरे तसेच प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे जयंत उथळे व विजय मांडके यांनी सांगितले.
संविधानिक मूल्यांच्या बाबत सातत्याने गावागावात जाऊन जनजागृती करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
आज उपोषण स्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अमितदादा कदम यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.