सातारा : सातारा तालुक्यातील सासपडे येथील खून प्रकरणातील संशयित आरोपी राहुल बबन यादव (वय ३४, रा. सासपडे, ता. सातारा) यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दि. १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
सदर प्रकरण बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्याची तपासादरम्यान मिळालेल्या नव्या तथ्यांनुसार, संबंधित आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३०२ (खून) सोबतच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो ॲक्ट २०१२) चे कलम ८ आणि १२ लागू करण्यात आले आहेत. संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर, सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. सुरेखा क्षीरसागर यांनी काम पाहिले.त्यांनी आरोपीच्या गुन्ह्याचे गांभीर्य, पुरावे व तपासाची दिशा लक्षात घेऊन पोलिस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला.
यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (डी.जे.१) श्री. शेटे यांनी आरोपीला १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कड्डुकर, आणि पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर करत आहेत.