गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात खव्यापासून मिठाईपर्यंत भेसळीवर एफडीएची कारवाई; १ कोटींचा साठा जप्त, ६ जणांना अटक

by Team Satara Today | published on : 22 September 2026


पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अन्न आस्थापनांविरोधात कारवाई केली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर केलेल्या कारवाईत १ कोटी १८ लाख ४३ हजार ३६४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत चार आस्थापनांवर गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली. एक आस्थापना सील करण्यात आली असून, २३ लाख रुपये किमतीची दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
पुणे विभागातील चार आस्थापनांची तपासणी केली असता प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आले. पिंपरी येथील मे. रसरंग, पिंपरी येथून २९ हजार ५०० रुपये किमतीचा ५९ किलो खवा जप्त करण्यात आला. खेड येथील मे. सहारा डेअरी प्रॉडक्ट्स, खेड येथून ६१ हजार ६०० रुपये किमतीचा १ हजार ८०८ किलो शाही स्वीट हलवा आणि १ लाख ६२ हजार २०० रुपये किमतीचा ८११ किलो ए-१ स्वीट हलवा मिसब्रँडेड असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला.
बिबवेवाडीतील मे. मंगल नॅचरोकेअर, बिबवेवाडी येथून २३ हजार ३१६ रुपये किमतीचे ३९.१५ किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले. मे. गालखा देवी स्वीट्स, आंबेगाव पठार येथून दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी ७ हजार ५०० रुपये किमतीची ३० किलो सोनपापडी जप्त करण्यात आली. मे. गणेश स्वीट्स, पिंपरी येथून ३८ हजार ८० रुपये किमतीचा ११९ किलो मिठामावा जप्त करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात तपासणी व कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दोन आस्थापनांचे परवाने निलंबित
अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे विभागातील दोन आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. पाषाण येथील आरपी हॉस्पिटॅलिटीज (रंगला पंजाब), पाषाण आणि मनीषा डोसा सेंटर, कर्वेनगर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा परवान्याच्या अट क्रमांक ३ तसेच ‘परिशिष्ट-४’मधील स्वच्छता व आरोग्यविषयक मानकांचे उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळून आल्याने हे परवाने निलंबित करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत करणार, येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना जारी केली जाईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुढील बातमी
कोयना भागातील वाघणे येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

संबंधित बातम्या