मर्ढे परिसरात अवैध देशी दारूची वाहतूक उघड; 34 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त, सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

by Team Satara Today | published on : 28 November 2026


सातारा : कराड येथून पुण्याच्या दिशेने आयशर ट्रकमधून सुरू असलेली अवैध देशी दारूची वाहतूक सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डी.बी. पथक) आज (दि. 28) सकाळी उघडकीस आणली. या कारवाईत 15 लाख 36 हजार रुपये किमतीच्या देशी दारूसह ट्रक आणि दोन मोबाईल असा एकूण 34 लाख 17 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहरात अवैध दारू वाहतूक व विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एका आयशर ट्रक मधून विनापरवाना देशी दारूची वाहतूक कराडवरून पुण्याकडे होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डी.बी. पथकाने पिरवाडी येथील किया शोरूमसमोर आणि वाढे फाटा येथे दोन पथके तैनात केली. सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास कराडच्या दिशेने येणारा संशयास्पद आयशर ट्रक व त्यासोबत असलेली क्रेटा गाडी पोलिसांना दिसली. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला; मात्र चालकांनी वाहने भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने नेली.
डी.बी. पथकाने पाठलाग केल्यानंतर क्रेटा वाहन पुण्याच्या दिशेने निघून गेले. तर, आयशर ट्रक आनेवाडी पुलाखालून मर्ढे गावाकडे जात असताना पथकाने वाहने आडवी लावून मर्ढे येथे त्याला अडवले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने ट्रकात पिण्याच्या पाण्याचे बॉक्स असल्याचे सांगितले. मात्र, पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये ’टँगो पंच’ देशी दारूचे बॉक्स आढळून आले.
यानंतर ट्रक व मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पंचनामा करण्यात आला. त्यात 15,36,000 रुपये किमतीची देशी दारू, 18,00,000 रुपये किमतीचा आयशर ट्रक आणि 81,200 रुपये किमतीचे दोन मोबाईल हँण्डसेट असा एकूण 34,17,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महेंद्र आनंदा डुबल (वय 34, व्यवसाय - ड्रायव्हर, रा. कामठी आळी, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. शुक्रवार पेठ, कराड), जमीर हारुन पटेल (रा. मलकापूर, कराड, जि. सातारा) आणि मंगेश एकनाथ हरपळे (रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, वैभव माने, राकेश सातपुते, प्रकाश रणबागले आणि पोलीस मित्र असिफ शेख यांच्या पथकाने केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रचना 2026 ला सातारकरांचा भरभरून प्रतिसाद; बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण, रंगारंग कार्यक्रमांनी होणार सांगता
पुढील बातमी
सातारा शहरात पाणीपुरवठ्याचा पेच सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाची धावपळ; पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात

संबंधित बातम्या