सातारा : दिवाळीचा सर्वत्र उत्साह असून, सोमवारी उत्साहात साजरी झालेली नरक चतुर्दशी आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा, भाऊबीजेच्या खरेदीसाठी सोमवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वच मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी उसळली होती. दिवाळी सणाचा पारंपारिक उत्साह सर्वत्र दिसून आला .
भाऊबीज जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये कपड्यांच्या खरेदीला प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. महिलांसाठी साड्या, कुर्ते, स्कर्ट, तर पुरुषांसाठी जॅकेट, कुर्त्यांचे सेट आणि मुलांसाठी पारंपरिक पोशाखांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर जाहीर केल्याने ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आकाशकंदील, तोरणे, फटाके आणि फराळ बनवण्यासाठीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोमवारचा सुट्टीचा दिवस साधून सातारकर बाहेर पडले होते.
सातारा शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये विशेषतः मोती चौक खण आळी पोवई नाका , रविवार पेठ आणि राजपथावर सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती. विशेषतः महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली. नव्या ट्रेंडचे कपडे, गृहसजावटीचे साहित्य, फराळ, फटाके आणि रांगोळीच्या साहित्यांना मोठी मागणी होती.
बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी दिवे, आकर्षक तोरणे आणि विविध प्रकारचे कंदील विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चायना आणि स्वदेशी बनावटीच्या साहित्यांना मोठी मागणी आहे. घराच्या सजावटीसाठी असलेले कृत्रिम फुले, मोत्यांची तोरणे, शुभ चिन्हे आणि झुंबर यांचे दर २०० ते १,५०० रुपयांदरम्यान आहेत. दिव्यांच्या आराससाठी डायमंड, क्रिस्टल, नियॉन आणि थायलंड लाइट्सना मोठी मागणी आहे.
दारासमोर लावण्यासाठी विविध प्रकारच्या पणत्या आणि मेणबत्त्या उपलब्ध असून, लाल मातीच्या पणत्या ३० रुपयांपासून मिळत आहेत. मोती आणि काच तुकड्यांनी सजवलेल्या पणत्या ६० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत. रांगोळीच्या साच्यांनाही मोठी मागणी असून, २० ते १५० रुपयांपर्यंत विविध आकारांतील साचे विक्रीसाठी आहेत. सातारा जि .प मैदान, सोनगाव परिसर करंजे नाका परिसर, मोळाचा ओढा येथील फटाक्यांच्या बाजारातही खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गावी जाणाऱ्या नागरिकांनी भावंडांसाठी कपडे, मिठाई आणि भेटवस्तूंची खरेदी केली. अनेकांनी रव खरेदी आटोपून रात्री घर सजावट सुरू केली. खरेदीनंतर फराळातील राहिलेल्या गोष्टी बनवण्यासाठी महिला मंडळाची लगबग सुरू होती. सणाच्या आनंदात रंगलेल्या सातारा जिल्ह्यात सर्वत्र रोषणाई, उत्साह आणि खरेदीचा जल्लोष दिसून येत आहे.