सातारा : पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर तब्बल वीस दिवसांनी सातारा पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीसाठी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 3 यादरम्यान विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेमध्ये सहा समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत.
या विशेष सभेत संदर्भातील माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली आहे .प्राप्त कार्यक्रमानुसार बांधकाम शिक्षण क्रीडा स्वच्छता पाणीपुरवठा नियोजन महिला आणि बालकल्याणयांचे प्रत्येकी 15 तर दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समितीसाठी नऊ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत .दिनांक अकरा रोजी विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये मुख्याधिकाऱ्यांकडे शिफारस पत्रे सादर करणे,दुपारी बारा ते सव्वा बारा यादरम्यान पिठासन अधिकाऱ्यांनी प्राप्त शिफारस पत्रांची छाननी करणे,सव्वा बारा ते साडेबारा यादरम्यान नाम निर्देशन पत्रे शिफारशी सह मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करणे,दुपारी साडेबारा वाजता विषय समित्यांचे सदस्य सभापती आणि स्थायी समितीची रचना घोषित करणे असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सहा विषय समित्यांच्या मध्ये आमदार गट आणि खासदार गट यांच्यामध्ये निश्चितच वजनदार समित्यांसाठी रस्सीखेच राहणार आहे. सभा बुधवार दि. 11 रोजी होणार असल्याने तत्पूर्वी मंगळवारी याबाबत दोन्हीनेत्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यामध्ये सर्वसमावेशक नावांवर विचार केला जाईल असा राजकीय अंदाज आहे. आपल्याला सभापती पदासाठी संधी मिळावी यासाठी नेत्यांकडे इच्छुकांची मोर्चे बांधणी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.