अनुसूचित जाती आरक्षण अंमलबजावणीसाठी सातार्‍यात 17 जूनला संघर्ष मोर्चा; मातंग समाजासह 58 वंचित जातींना समान संधीची मागणी

by Team Satara Today | published on : 15 June 2026


सातारा : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ वंचित व अतिमागास घटकांपर्यंत पोहोचवावा, या प्रमुख मागणीसाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीने बुधवार, दि. 17 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ’सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, शाहू चौक येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्य सरकारांना अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार प्रदान केला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीने आपला अहवाल सादर केला असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी करून अनुसूचित जातींतील वंचित आणि अतिमागास घटकांना न्याय द्यावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मोर्चाच्या आयोजकांच्या मते, आरक्षणाचा मूळ उद्देश सामाजिक विषमता दूर करणे, शैक्षणिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळवून देणे हा आहे. मात्र, अनुसूचित जाती प्रवर्गातील काही जातींना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळाला नसल्याने अंतर्गत वर्गीकरणाची गरज निर्माण झाली आहे. मातंग समाजासह 58 वंचित जातींना समान संधी मिळावी, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मोर्चा कोणत्याही समाज अथवा जातीविरोधात नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक हक्कांच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या समतेच्या विचारांना पुढे नेण्यासाठी हा संघर्ष असल्याचेही सांगण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावरील नोकरभरतीपूर्वी आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करून अनुसूचित जातींतील मागास घटकांना न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी गावातच मिळणार इंग्रजीचे धडे; 37 शाळांना सेमी इंग्रजीची मंजुरी
पुढील बातमी
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांना उद्यापासून प्रारंभ; कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथके तैनात

संबंधित बातम्या