किरकोळ वादातून सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे युवकावर जीवघेणा हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 21 June 2026


सातारा : सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. एका युवकाला शिवीगाळ करत डोक्यावर वीट मारून जखमी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

खोजेवाडी (ता. सातारा) येथे १८ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत कुणाल रामचंद्र सुतार (वय १८ वर्षे ४ महिने, रा. पाटण) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोजेवाडी येथील राज सुभाष लोहार यांच्या घराजवळ फिर्यादी व त्यांचे साथीदार उभे असताना आरोपी अवी उर्फ उत्तम देशमुख, अथर्व पवार, विराज पवार आणि आणखी एक साथीदार यांनी किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर वीट मारून जखमी केले. तसेच इतर साथीदारांनाही मारहाण करून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून बोरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे रहा - जिल्हाधिकारी संतोष पाटील, 'कॉफी विथ कलेक्टर' या विशेष उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद
पुढील बातमी
सातारा–सांगली विधान परिषद निकालाकडे राज्याचे लक्ष; आज (सोमवारी) सांगलीत मतमोजणी :दुपारपर्यंत निकाल हाती येणार

संबंधित बातम्या