पिपोंडे बु. : पिपोंडे बु. ता. कोरेगाव, हद्दीत सोनके ते वाठारकडे जाणाऱ्या मार्गावर दि,१७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी पोलीस असल्याचे भासवून ६३ वर्षीय वृद्धाची सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामराव जाधव हे दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास संजीवनी मॉलसमोर (सोनके–वाठार स्टेशन रोड) वरून जात असताना, काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या मोटारसायकलला थांबविण्याचा इशारा केला.
त्या भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगत खोटे आयकार्ड दाखवले आणि म्हणाले, “या भागात चोरीचे प्रकार वाढले आहेत, आम्हाला पुणे ऑफिसतून पाठवले आहे.” यानंतर त्यांनी फिर्यादींच्या बोटातील एकूण साडे चार तोळ्यांच्या चार सोन्याच्या अंगठ्या त्याची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असून त्या चारी अंगठ्या काढून रुमालात ठेवल्याचा भास केला. मात्र प्रत्यक्षात रुमालात अंगठ्या न ठेवता त्या चोरून नेल्या नेत पळ काढला. साडेचार तोळ्याचे दागिने अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची फिर्याद रामराव जाधव (वय ६३ रा. पिंपोडे बुद्रुक) यांनी वाठार पोलिसात दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले करीत आहेत