नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे जोरदार हल्ले केले. त्यानंतर चार दिवस चाललेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात रशियाकडून खरेदी केलेल्या शस्त्रांनी भारताला खूप मदत केली. विशेषतः रशियाच्या S-400 हवाई संरक्षण यंत्रणेने 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर उडणाऱ्या पाकिस्तानी AWACS विमानाला पाडले. याशिवाय, या यंत्रणेने पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांना अचूक लक्ष्य केले. आता भारत रशियाकडून आणखी शस्त्रे खरेदी करू शकतो.
रशियाने भारताला सुखोई Su-57 लढाऊ विमान, सुखोई Su-35 जेट, हवेतून हवेत मारा करणारे R-37 क्षेपणास्त्र आणि S-500 हवाई संरक्षण यंत्रणा देण्याची ऑफर दिली आहे. भारताला या शस्त्रांची नितांत गरज आहे, परंतु काही कारणांमुळे भारताने अद्याप रशियाकडून कोणतेही नवीन शस्त्रे खरेदी करण्यास सहमती दर्शवलेली नाही. मात्र, सध्याची भू-राजकीय परिस्थिती पाहता भारत लवकरच रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करू शकतो.
रशियन मीडिया स्पुतनिकशी बोलताना, सेंटर फॉर अॅनालिसिस ऑफ वर्ल्ड आर्म्स ट्रेडचे संचालक आणि रशियन नॅशनल डिफेन्स मासिकाचे मुख्य संपादक इगोर कोरोत्चेन्को म्हणाले की, रशियाचे प्रमुख स्टेल्थ विमान एसयू-५७, लांब पल्ल्याचे आर-३७ क्षेपणास्त्र आणि एस-५०० हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यासाठी क्रांतिकारी ठरू शकतात. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या अनेक नवीन रेजिमेंट खरेदी करण्याची शक्यता विचारात घेत आहे.
एस-५०० पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र/अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे, जी एस-४०० आणि ए-२३५ एबीएम क्षेपणास्त्र प्रणालींचे अपग्रेड व्हर्जन आहे. एस-५०० अल्माझ-अँटी एअर डिफेन्स कन्सर्नने विकसित केले आहे. रशियाचा दावा आहे की, S-500 हे नवीनतम हायपरसोनिक शस्त्रे रोखण्यास देखील सक्षम आहे. अशा क्षमतेची यशस्वी चाचणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, सुखोई Su-57 हे ट्विन-इंजिन असलेले स्टेल्थ मल्टीरोल लढाऊ विमान आहे. रशियाने ते PAK FA कार्यक्रमांतर्गत विकसित केले आहे. हे लढाऊ विमान हवाई लढाई तसेच जमीन आणि समुद्री हल्ले करण्यास सक्षम आहे.