सातारा : पुणे येथे पुढील महिन्यात होणाऱ्या २१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयसिंगपूर येथील प्रसिद्ध कवयित्री व गझलकार डॉ. सुनंदा शेळके यांची निवड झाली आहे. गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी ही माहिती दिली.
साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळींचे व्यासपीठ म्हणून परिचित असलेल्या सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व भारतीय शिक्षण संस्था (कोथरूड, पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात हे साहित्य संमेलन होत आहे. अकादमीच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुनंदा शेळके यांची निवड करण्यात आली. डॉ. बसवेश्वर चेणगे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सुनंदा सुभाष शेळके या सध्या बारामती येथील तुळजाराम चतुरचंद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे चंद्रकवडसे, साद्यंत, ऋतुबिंब हे काव्यसंग्रह, झरोखेसे झाँकता चाँद ('चंद्रकवडसे'चा हिंदी अनुवाद), आरस्पानी स्वप्ने, गज़लगंध हे गझलसंग्रह, प्रतिभेच्या पारंब्या हा ललित लेख संग्रह, जंगल कथा हा कथासंग्रह, पखवाली पेटी हा परिकथा संग्रह, महेश दत्तानी : न्यू व्हॉइस ऑफ थिएटर, महेश दत्तानीज कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन ड्रामा (इंग्रजी) असे विपुल साहित्य प्रकाशित असून यातील जंगल कथा या कथासंग्रहाचे हिंदी व इंग्रजीतून अनुवादही प्रसिद्ध आहेत. विविध दैनिके, नियतकालिके यामधून त्यांचे स्तंभलेखन सुरू आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून ३३ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी विविध मुशायऱ्यातून गझल सादरीकरण केले असून 'गझलरंग' हा गझलांचा, तर 'कविता माझी' हा त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम सर्वत्र होत असतो. 'सांगली जिल्ह्यातील अप्रकाशित लावण्यांचा अभ्यास' या विषयावर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पीएच्.डी. केली आहे.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल सुरेश भट गझल गौरव पुरस्कार, कृष्णाई गझल गौरव पुरस्कार, पाक्षिक चंद्रभागा तीरी गझल गौरव पुरस्कार, कवी सुधांशु पुरस्कार, कवी वसंत बापट पुरस्कार, गुंफण साहित्य पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ गुणवंत शिक्षक पुरस्कार, पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार अशा एकंदर ४३ राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.