सातारा : ज्येष्ठ लेखिका कल्पना देशपांडे यांनी लिहिलेल्या त्या दरवाजाआड या कथासंग्रहाचा लोकार्पण सोहळा व या पुस्तकावरील चर्चासत्र कार्यक्रम येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न झाला. कल्पना देशपांडे यांनी या कथासंग्रहाच्या माध्यमातून कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्तीच्या आगळ्या संगमाचे दर्शन घडवण्यात आल्याचे मत मान्यवरांनी पुस्तकावरील चर्चासत्रात व्यक्त केले.
या लोकार्पण सोहळ्याला चर्चासत्रात भाग घेण्यासाठी सातारा येथील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखिका ऍडव्होकेट सीमंतिनी नुलकर, लेखक व पर्यावरण तज्ञ डॉक्टर संदीप श्रोत्री,लेखक व चित्रपट अभ्यासक्रम मुकुंद फडके, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस उपस्थित होते
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शिरीषचिटणीस यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीसाठी दीपलक्ष्मी सभागृह कायमच उपलब्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
लेखिका कल्पना देशपांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये या कथासंग्रहातील कथामागील प्रेरणा आणि प्रोत्साहन याचा उलगडा केला.सातारा हे माझे माहेर असल्याने येथील लोकार्पण सोहळा मनाला भावणारा आहे असे त्यांनी सांगितले
सिमंतिनी नुलकर यांनी कथालेखन हा प्रकार अवघड असल्याचे सांगून हे कसरतीचे काम लेखिका कल्पना देशपांडे यांनी लीलया पार पडल्याचे सांगितले. मराठी कथादालनाला समृद्ध आणि मोठा इतिहास आहे त्यात कथासंग्रहाने भर घातली असून आपले आपण पाहिलेले अनुभव रंगवून सांगण्याचे कौशल्य लेखिकेकडे आहे हेच कथासंग्रहातील विविध कथांवरून सिद्ध होते असे त्यांनी स्पष्ट केले
मुकुंद फडके यांनी आपल्या भाषणामध्ये या कथासंग्रहातील सर्व कथांचा आढावा घेताना या कथासंग्रहाच्या निमित्ताने गुंतागुंतीच्या मानवी संबंधाचा उलगडा उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचे सांगितले. दरवाजाआड हे या कथासंग्रहाचे नाव प्रातिनिधिक स्वरूपाचे असून प्रत्येकाच्या मनातील दारे उघडण्याचे कामही हा कथासंग्रह करतो असे त्यांनी स्पष्ट केले आगामी कालावधीमध्ये कल्पना देशपांडे यांच्याकडून अशाच प्रकारे सकस साहित्यिक निर्मितीची अपेक्षा आहे अशा शुभेच्छही त्यांनी दिल्या
डॉ संदीप श्रोत्री म्हणाले,आसपास घडणाऱ्या घटनांमधूनच कथा लिहिण्यासाठी एखादी कल्पना सापडते हे या कथासंग्रहातील विविध कथांवरून लक्षात येते लेखिका कल्पना देशपांडे यांची निरीक्षण शक्ती सुंदर असून त्यांनी अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे केले आहेत कथा लेखन हा अवघड साहित्यप्रकार लेखिकेने अत्यंत सहजपणे हाताळला आहे
विनोद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणांमध्ये एक दर्जेदार लेखिका म्हणून कल्पना देशपांडे यांचा उल्लेख केला. त्यांच्या या दर्जेदार कथा निर्मितीमुळेच त्यांना सातारा येथील संमेलनामध्ये कथाकथनाची संधी देण्यात आली होती असे स्पष्ट करून विनोद कुलकर्णी म्हणाले,या कथा संग्रहामध्ये कल्पना देशपांडे यांनी विविध प्रकारच्या शैलीचा लिलया वापर केला आहे. ग्रामीण नागरी आणि इतर अनेक भाषा शैलीचा वापर या कथासंग्रहात केलेला दिसतो
सूत्रसंचालन दिपाली चरेगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन दिलीप चरेगावकर यांनी केले. या कार्यक्रमाला सातारामधील अनेक साहित्य रसिक उपस्थित होते