सातारा शहर पोलिसांनी केले 170 गुन्हेगार हद्दपार; 668 सराईतांवर प्रतिबंधक कारवाई

by Team Satara Today | published on : 15 November 2024


सातारा : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सातारा शहर पोलिसांनी कारवाईचा धडाका मारत 170 सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. तसेच 668 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा चे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी विधानसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्याचप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सातारा तालुका यांनी सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील 170 सराईत गुन्हेगारांना 17 ते 24 नोव्हेंबर दरम्यान सातारा जिल्हा व परिसर हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधितांना मतदान करण्यासाठी दि. 20 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे.

याचप्रमाणे 668 सराईत गुन्हेगारांवर शांतता राखण्याबाबत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

आचारसंहिता कालावधीत आत्तापर्यंत सातारा शहर पोलिसांनी 1266 लिटर अवैध दारू पकडून 55 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चार लाख 95 हजार रुपये किंमतीचा 205 किलो अवैध गुटखा जप्त केला आहे. याच बरोबर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या