सातारा : सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक करुन घराकडे जात असताना एकाच दुचाकीवरुन आलेल्या 3 चोरट्यांनी महिलेला कोयत्यासारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून चैन स्नॅचिंग केले. या घटनेत 2 तोळ्याचे मंगळसूत्र लंपास झाले असून या बाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ. वंदना प्रशांत शिंगटे (वय 47, रा. फॉरेस्ट कॉलनी, विलासपूर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सौ.वंदना शिंगटे या नेहमीप्रमाणे सोमवारी कॉलनीतील महिलेसोबत फिरायला गेल्या होत्या. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर घराकडे जात असताना अचानक एका दुचाकीवरुन तीन युवक तेथे आले. त्यांनी सौ.वंदना शिंगटे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि गाडीवरुन पळून गेले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.