सातारा : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी नावाच्या हत्तीणीला, अलीकडेच गुजरात राज्यातील जामनगर जवळील वनतारा येथे नेण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक आणि प्राणी प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांनी हत्तीला परत आणण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी आज मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, महादेवी हत्तीणीला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी, कॉंग्रेसच्या आंदोलनात सर्व समाजाच्या नागरिकांनी व संघटनांनी एकत्र यावे. गुजरात मधील उद्यानामध्ये या हत्तीणीला नेल्यामुळे, नागरिकांमधून तीव्र भावना उमटत आहे. त्यामुळे लोक भावना, लोक श्रद्धेचा विचार करून, महादेवी हत्तीणीला आपल्या मूळ जागी, कोल्हापूर येथील नांदणी मठात त्वरित हस्तांतरित करावे. हे करत असताना तिच्या सुरक्षिततेची तितकीच काळजी घ्यावी. या मागणीची गांभीर्याने दखल घेतली नाही तर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
यावेळी, बाबुराव शिंदे, अरबाज शेख, जगन्नाथ कुंभार, मनोज तपासे, नाझीम इनामदार, सुरेश कुंभार, संभाजी उत्तेकर, रणधीर गायकवाड, सुरेश इंगवले, दादासाहेब जैन, मोहम्मद मुल्ला, सईद बागवान, बाबासाहेब चतुर, अन्वर पाशा खान, सोन्या बागवान आदी उपस्थित होते.