सातारा जिल्ह्यात दुष्काळी संकटात कृषी विभागाचा दिलासा; कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे फळबागांना संजीवनी

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा  :  सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आणि त्यांच्या फळबागांना वाचवण्यासाठी कृषी विभागाने प्रभावी पावले उचलली आहेत. उपलब्ध पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर करणे, लागवड खर्च कमी करणे आणि दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता  तंत्रज्ञान आधारित फळबाग लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी व इतर निविष्ठांचा अतिशय योग्य आणि मोजका वापर होण्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
या नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत सन २०२५-२६ मध्ये फलटण, माण, खटाव, कोरेगाव, जावळी आणि सातारा या दुष्काळप्रवण तालुक्यातील सुमारे १५०० शेतकऱ्यांच्या शेतावर ७४० हेक्टर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित फळबाग लागवड तंत्रज्ञान प्रकल्प राबविण्यात आला. या माध्यमातून दुष्काळी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा योग्य मेळ घालून पिकांना जीवदान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याशिवाय दुष्काळी स्थितीमध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या मौल्यवान फळबागा वाचवण्यासाठी त्यांना सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, आच्छादन  तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि फळबाग लागवडीचे सी.आर.ए. तंत्रज्ञान राबविण्यावर भर दिला जात आहे. उपलब्ध पाण्याचा थेंबन् थेंब वापरावा आणि त्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर कसा करावा यासाठी विविध उपाययोजनांवर काम सुरू आहे.
शेतकऱ्यांपर्यंत या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत विशेष मोहीम, प्रशिक्षण सत्रे आणि शेतीशाळांचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे, ज्यामुळे दुष्काळातही शेतकरी संकटाचा यशस्वीपणे सामना करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवा संकल्प अभियानांतर्गत महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास योजनेबाबत मार्गदर्शन
पुढील बातमी
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले; पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण संपन्न

संबंधित बातम्या