पंतप्रधान मोदींची सत्ता आता अंतिम टप्प्यात, भाजपकडून उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू; काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधींचे टीकास्त्र

by Team Satara Today | published on : 20 August 2026


नवी दिल्ली : नरेंद्र मोदींचा राजकीय अस्त जवळ आला असून त्यांची सत्ता आता अंतिम टप्प्यात आहे, असे खळबळजनक विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. भाजपकडून मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोधही सुरू झाला आहे, असा दावाही त्यांनी केला. आज (दि. २०) काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

दिल्लीतील 'इंदिरा भवन' येथील काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. सूत्रांच्या हवाल्याने 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीत राहुल गांधी म्हणाले की, "नरेंद्र मोदींचा राजकीय अस्त जवळ आला आहे. त्यांची वेळ संपली आहे. मोदींची सत्ता अंतिम टप्प्यात आहे आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू आहे," असा दावा त्यांनी केला.

सरकार पूर्णपणे बॅकफूटवर: राहुल गांधी

बैठकीत काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन करताना 'केंद्र सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आले असून काँग्रेस नेत्यांनी आता अधिक आक्रमक होऊन सरकारला घेरण्याची रणनीती आखावी,' असे आवाहनही राहुल गांधींनी केले. बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या रणनीतीवर चर्चा केल्याचे समजते.

सरकारने ९४ हजार शाळा बंद पडल्या; खर्गे यांचा दावा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही बैठकीला संबोधित केले. गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला. अलीकडच्या काळात ९४ हजार शाळा बंद पडल्या आहेत, असा दावा खर्गे यांनी केला आहे. त्यांनी तरुणांसाठी 'शिक्षणापासून रोजगारापर्यंतचा' स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालमर्यादित आराखडा तयार करण्याची मागणी केली.

राम मंदिर देणग्यांबाबत खर्गे यांचा प्रश्न

बैठकीदरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी राम मंदिर ट्रस्टला मिळालेला निधी, सोने आणि इतर देणग्यांचा मुद्दाही उपस्थित केला. या देणग्यांचा हिशोब कसा ठेवला जात आहे आणि त्यांचा वापर कसा होत आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही आर्थिक अनियमिततेची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी खर्गे यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेना पक्षातील बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार अपात्र ठरणार? सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
पुढील बातमी
जलसंधारणासाठी राजवाडा ते शिवतीर्थ वॉकेथॉनचे २१ ऑगस्ट रोजी आयोजन; नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या