पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर लवकरच काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अखेर त्यांनी आज माध्यमांसमोर येत काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तसेच आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपला अधिकृत निर्णय जाहीर करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज सकाळीच माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, ‘कुठलाही निर्णय घेणं हा कठीण असतो. गेल्या 10-12 वर्षांत काँग्रेससोबत असताना सर्वजण कुटुंबाप्रमाणे झाले होते. लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणूक असो, पक्षातील कार्यकर्त्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. मी निवडणूक हरलो हा भाग वेगळा पण त्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली होती. पक्ष सोडताना मनाला दु:ख होतय, पण आपणही माणूस आहे. अशा वेळी कार्यकर्तेही बऱ्याच दिवसांपासून बोलत होते. मतदारांशी चर्चा केल्यानंतरही त्यांनी आमची कामे कोण करणार, असं विचारलं.”
“लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण जनतेला न्याय देऊ शकत नाही. अशा वेळी दोन तीन वेळा कामानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, मंत्री उदय सामंत यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी देखील आमच्यासोबत काम करा अशी विनंंती केली. मतदारसंघातील जनतेशी चर्चा केल्यानंतरही आपल्याला काम तर करावचं लागेल, पण सत्तेशिवाय कोणतीही कामे होणार नाहीत. हेही लक्षात आलंं होतं. त्यामुळे ज्यांच्या चेहऱा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचला आहे, त्यांच्यासोबत काम करण्यास हरकत नाही, असा विचार झाला. त्यामुळे आज मी माझा निर्णय घेतला. आज सायंकाळी मी एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेणार आहे. त्यांच्या भेटीनंतर आमचा निर्णय अधिकृतरित्या जाहीर करू.” मी एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणतीही मागणी केली नाही. असेही त्यांनी यावेळी नमुद केलं.
काही दिवसांपूर्वी, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या एका व्हायरल स्टेटसने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. त्यांनी आपल्या स्टेटसला गळ्यात भगवं उपरणं घातलेला फोटो ठेवला होता. तसेच, त्यावर ‘तेरे कदमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणे ठेवले होते.
माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या या भेटीमुळे धंगेकर लवकरच शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार? अशी चर्चा रंगली होती.या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना रवींद्र धंगेकर यांनी ही भेट वैयक्तिक कारणासाठी होती, असे सांगितले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्या वैयक्तिक कामासाठी मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना माझ्या कामाबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी मदतीचे आश्वासन दिले.”धंगेकर यांच्या या भेटीनंतर त्यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चांना वेग आला होता.